मृत्यूच्या दाढेतून माता व बाळाची सुखरूप सुटका!
अहेरीच्या महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांची तत्परता

प्रसूतीदरम्यान माता आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण झालेला असताना जन्मानंतर बाळाच्या हालचाली बंद झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टरांच्या तत्परतेमुळे माता आणि नवजात बाळाला जीवदान मिळाले.
मुलचेरा तालुक्यातील मल्लेरा येथील अर्चना अजय सिडाम (30) यांना 12 ऑक्टोबर रोजी प्रसूतीसाठी मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बाळाचे यावेळी प्रसूतीत अडचणी निर्माण झाल्या. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन मातेला पुढील उपचारासाठी अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयात हलविण्यात आले.
रात्री सुमारे 9.30 वाजता रुग्णालयात दाखल झाल्यानंतर डॉ. शिवराम कुमरे, भूलतज्ज्ञ डॉ. अश्विनी पाटील, डॉ. अनिल गेडाम आणि वैद्यकीय पथकाने तातडीने उपचार सुरू केले. प्रसूती यशस्वी झाली; मात्र जन्मानंतर बाळाच्या हालचाली दिसत नव्हत्या आणि बाळ रडलेही नव्हते. बाळाला विशेष नवजात शिशू निगा कक्षात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे अर्ध्या तासाने बाळाच्या हालचाली सुरू झाल्या.त्यामुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. डॉक्टरांमधील समन्वय आणि तातडीने केलेले उपचार यामुळे माता-बाळाला आवश्यक वैद्यकीय मदत मिळाली. अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचार्यांच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
