प्रभाकरण यांच्या पुढाकारातून हेडरीत प्रगत वैद्यकीय सुविधा

गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, यासाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या पुढाकारातून हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयात प्रगत वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांमुळे ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना मोठा दिलासा मिळत असून, नुकत्याच झालेल्या एका आपत्कालीन सिझेरियन शस्त्रक्रियेतून रुग्णालयातील वैद्यकीय सुविधांची उपयुक्तता पुन्हा अधोरेखित झाली आहे. एपिड्युरल अॅनेस्थेशियाच्या मदतीने ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली असून, मातेने 2.277 किलो वजनाच्या निरोगी बाळाला जन्म दिला.
संबंधित गर्भवती महिलेला सुरुवातीला प्रसूतीवेदना कमी करण्यासाठी एपिड्युरल अॅनाल्जेसिया देण्यात आले होते. मात्र, गर्भजलाचे प्रमाण कमी असणे, गर्भातील बाळाच्या वाढीवर मर्यादा येणे आणि बाळाच्या मानेभोवती नाळेचा एक वेढा असणे, अशा गुंतागुंती आढळून आल्या. त्यातच बाळाला गर्भाशयात त्रास होण्याची लक्षणे दिसू लागल्याने डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी यापूर्वी दिलेल्या एपिड्युरल अॅनेस्थेशियाचा प्रभाव शस्त्रक्रियेसाठी आवश्यक पातळीपर्यंत वाढविण्यात आला. त्यामुळे जनरल अॅनेस्थेशिया देण्याची आवश्यकता भासली नाही. वैद्यकीय पथकाच्या समन्वयातून शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान मातेला वेदनांचा त्रास झाला नाही. उच्च जोखमीच्या गर्भधारणेत योग्य वैद्यकीय तंत्र, वेळेवर घेतलेला निर्णय आणि कुशल वैद्यकीय पथकाचे समन्वित कार्य किती महत्त्वाचे असते, हे या घटनेतून स्पष्ट झाले. सुरक्षित मातृत्व, रुग्णकेंद्रित उपचार आणि दुर्गम भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रुग्णालय कार्यरत आहे. आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि कुशल मनुष्यबळ यांच्या माध्यमातून ग्रामीण व आदिवासी भागातील सर्वसामान्य जनतेला आरोग्यसेवेचा आधार मिळत असल्याचे या यशस्वी प्रसूतीतून दिसून आले.
दुर्गम भागात दर्जेदार आरोग्यसेवेचा आधार
गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासीबहूल भागात डॉक्टर, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि आपत्कालीन उपचार सुविधा उपलब्ध होणे हे सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे आहे. या पृष्टभूमीवर बी. प्रभाकरन यांच्या पुढाकारातून लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात आलेल्या वैद्यकीय सुविधांमुळे स्थानिक नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपचार मिळण्यास मदत होत आहे. गंभीर परिस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे, तसेच उपचारांसाठी दूरच्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होणे, यासाठी अशा सुविधांचे महत्त्व मोठे आहे. या रुग्णाच्या उपचारांची जबाबदारी सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती वर्मा (बुर्रीवार) यांनी सांभाळली. त्यांना रुग्णालयातील वैद्यकीय पथकाची मोलाची साथ लाभली.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
