31 ऑक्टो. 2026, 19:56

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

वर्धेचा राघव निवर्ती ठरला महाराष्ट्राचा राज्यविजेता

दुहेरीतही रौप्यपदकाची कमाई

वर्धेचा राघव निवर्ती ठरला महाराष्ट्राचा राज्यविजेता
तरुण भारत

येथील राघव निवर्ती याने नागपूर येथे आयोजित योनेक्स-सनराईज जी. एच. रायसोनी मेमोरियल महाराष्ट्र सब-ज्युनिअर राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा-२०२६ मध्ये दिमाखदार कामगिरी करीत ११ वर्षांखालील मुलांच्या एकेरी गटात सुवर्णपदक पटकावून महाराष्ट्राचा राज्यविजेता होण्याचा मान मिळवला. दुहेरी गटात त्याने रौप्यपदक पटकावले. २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान नागपूर येथे पार पडलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत राघवने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर ही उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे वर्धा जिल्ह्यासह अल्फा ड्रीम बॅडमिंटन अकादमीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

राघवच्या या यशामागे नागालॅण्डचे प्रशिक्षक लेइहोंग एच. के. आणि शेमॉन एच. के. यांचे योगदान आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळे, तांत्रिक प्रशिक्षणामुळे आणि मेहनतीमुळे राघवच्या खेळात सुधारणा होऊन त्याला राज्यस्तरावर हे यश संपादन करता आले. ॲली स्पोर्ट्स मॅनेजमेंट ॲण्ड डेव्हलपमेंट कंपनीच्या व्यवस्थापनाखाली अल्फा ड्रीम बॅडमिंटन अकादमीचे संचालन केले जाते. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण, शिस्तबद्ध सराव आणि स्पर्धांमध्ये प्रगती करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करून देण्याच्या अकादमीच्या प्रयत्नांना राघवच्या यशामुळे मोठे बळ मिळाले आहे. अकादमीचे संचालक दिनेश चन्नावार, आशिष झोडे आणि रजनीश जैन यांनी राघवचे अभिनंदन केले.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय