वकिलाला शिवीगाळ करून मारहाण; जेल कर्मचाऱ्यावर गुन्हा
मध्यवर्ती कारागृहाबाहेर वाद; शंकरनगर चौकात केला हल्ला

मध्यवर्ती कारागृहाबाहेर एका जेल कर्मचाऱ्याने वकिलाला शिवीगाळ करून त्याच्याशी वाद घातला. त्यानंतर कारागृह कर्मचाऱ्याने पाठलाग करीत शंकरनगर चौकात वकिलाला पुन्हा मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी अमोल येवतकर पाटील, (वय ३५) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गौरव दिगंबर वंजारी (२६, रा. जगत अपार्टमेंट्स, अंबाझरी) असे तक्रारदार वकिलाचे नाव आहे.
२७ ऑक्टोबर रोजी ते सहकारी श्रीकांत राजू निमजे यांच्यासोबत नागपूर मध्यवर्ती कारागृहात गेले होते. त्यांना न्यायालयात बाजू मांडण्यासाठी कायदेशीर दस्तऐवज सादर करायचे होते. यावेळी आरोपी अमोल पाटील याने वंजारी यांना शिवीगाळ करून या वेळी कारागृहात का आले?, अशी विचारणा केली. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. काही वेळाने शंकरनगर चौकाजवळ आरोपी दुचाकीने तेथे आला आणि त्याने पुन्हा वंजारी यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वंजारी यांनी मोबाईलवर घटनेचे चित्रीकरण सुरू करताच आरोपीने मागून येऊन त्यांचा गळा व केस पकडले.तसेच मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. याचवेळी हातातील धातूच्या कड्याने त्यांच्या कपाळावर वार केल्याने ते जखमी झाले. त्यानंतर वंजारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचार घेतले. त्यांच्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
