संघासाठी संपूर्ण देशच कुटुंब : दीपक तामशेट्टीवार

दारव्हा
इतिहास साक्षी आहे. जेव्हा हिंदू समाज असंघटित झाला, तेव्हा पराभव पत्करावा लागला. पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे, सर्व समाज संघटित व्हावा, हे ध्येय उराशी बाळगून १९२५ साली डॉ. केशव बळीरामपंत हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. १४० कोटी लोकसंख्येच्या संपूर्ण देशालाच संघ आपले कुटुंब मानतो. या देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाचा भाग आहे, ही भावना सर्वांनी जोपासली पाहिजे. आपल्या कुटुंबात काही अडचण आल्यास ती आपण एकत्र बसून सोडवितो, त्यासाठी आंदोलन करीत नाही, हीच भावना सर्वांच्या मनात असली पाहिजे, असे मत विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार यांनी व्यक्त केले.
दारव्हा नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव २५ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी स्टेडियम मैदानात पार पडला. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रूपेश खंदाडे, खंड संघचालक नंदलाल पालिवाल, नगर संघचालक गजानन गाभे उपस्थित होते.
सुरुवातीला अतिथींच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. व्यायामयोग, घोष प्रात्यक्षिक झाल्यानंतर प्रास्ताविकात पाहुण्यांचा परिचय गजानन गाभे यांनी करून दिला. अमृतवचन, सुभाषित, वैयक्तिक गीतानंतर प्रमुख अतिथींनी मार्गदर्शन केले. संघ ही जगातील सर्वात मोठी समाजसेवी संघटना आहे. देशात कुठलेही संकट, नैसर्गिक आपत्ती असो, मदतीला सर्वात आधी संघ स्वयंसेवकच पोहोचतात. संघ सेवा ही ईश्वर सेवा आहे. या राष्ट्रीय कार्यासाठी समाजाने संघाशी जुळावे, असे आवाहन डॉ. रूपेश खंदाडे यांनी केले.
मार्गदर्शन करताना दीपक तामशेट्टीवार म्हणाले, संघ कोणाच्या विरोधात नाही. जो या देशाला आपली माता मानतो आणि भारत जिंकल्यानंतर ज्याला आनंद होतो, तो खरा भारतीय आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ अशा घोषणा देणाऱ्यांच्या आम्ही विरोधात आहोत, आमच्या दृष्टीने देश प्रथम आहे.
सगळे धर्म आत्मउद्धाराचे केंद्र आहे. मार्ग वेगवेगळे असतील पण पोहोचायचं एकाच ठिकाणी आहे. देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो, याचं भान आपल्याला असणे गरजेचं आहे. धर्म वाढविणे हा आमचा उद्देश नाही. आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ची भावना जोपासतो, वसुधा आमची माता आहे, असे त्यांनी सांगितले. या उत्सवाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्सवापूर्वी नगरातून मुख्य मार्गाने पथसंचलन काढण्यात आले.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
