सागवान तस्करीत जप्त बैलांचा 4 नोव्हेंबरला लिलाव

सागवान लाकडाच्या अवैध तस्करीप्रकरणी वनविभागाने जप्त केलेल्या दोन बैलांचा जाहीर लिलाव बुधवारी, 4 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील पातानी जंगल परिसरात 26 एप्रिल 2026 ला वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी पानगे व त्यांच्या पथकाने कारवाई करून अवैध सागवान तस्करीचा प्रयत्न उधळून लावला होता. या कारवाईत तस्करीसाठी वापरले जात असलेले दोन बैल जप्त करण्यात आले होते.
या दोन्ही बैलांचा लिलाव 4 नोव्हेंबरला सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत अस्थायी विक्री आगार, सिरोंचा-आसरअल्ली रोड, सिरोंचा येथे होणार आहे. लिलावापूर्वी इच्छुक खरेदीदारांना बैलांची प्रत्यक्ष पाहणी करता यावी यासाठी दोन्ही बैल आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे बोली लावण्यापूर्वी इच्छुकांनी कार्यालयात जाऊन बैलांची पाहणी करावी, असे वनविभागाने कळविले आहे.
लिलावात सहभागी होण्यासाठी इच्छुकांना अंदाजित बोलीच्या 10 टक्के किंवा किमान एक हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे. यशस्वी बोलीदाराची अनामत रक्कम अंतिम बोलीच्या रकमेत समायोजित करण्यात येईल. बोली मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी शासनाच्या नियमानुसार करासह संपूर्ण रक्कम भरून बैलांचा ताबा घेणे बंधनकारक आहे. लिलावात खरेदी केलेला बैल किमान एक वर्ष दुसर्या व्यक्तीस विकता येणार नाही. त्यासाठी खरेदीदारास एक वर्षाचे हमीपत्र देणे आवश्यक राहणार आहे. या कालावधीत बैलाची विक्री केल्यास संबंधिताविरुद्ध वनविभागामार्फत फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
लिलावात सहभागी होणार्यांनी 7/12 उतारा, आधारकार्ड व पॅनकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. लिलाव पुढे ढकलण्याचा अथवा रद्द करण्याचा अधिकार उपवनसंरक्षक (प्रा.), सिरोंचा यांनी राखून ठेवला आहे. या लिलावाची सविस्तर माहिती वनविभागाच्या कार्यालयीन नोटीस बोर्डवर तसेच संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
