31 ऑक्टो. 2026, 20:42

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

रोजच्या वांग्याच्या भाजीला द्या बंगाली ट्विस्ट! दही-काजूच्या ग्रेव्हीतील ‘बेगुन रेझाला’ एकदा नक्की करून पाहा

रोजच्या वांग्याच्या भाजीला द्या बंगाली ट्विस्ट! दही-काजूच्या ग्रेव्हीतील ‘बेगुन रेझाला’ एकदा नक्की करून पाहा
तरुण भारत

रोजच्या जेवणात तीच बटाटा-वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर यावेळी काहीतरी वेगळे करून पाहायला हरकत नाही. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध ‘बेगुन रेझाला’ हा वांग्यापासून तयार केला जाणारा चविष्ट पदार्थ तुमच्या जेवणाची रंगत वाढवू शकतो. तळलेली वांगी, दही, काजू, पांढरे तीळ आणि दुधापासून तयार केलेली घट्ट, मलईदार ग्रेव्ही हे या पदार्थाचे वैशिष्ट्य आहे. त्यावर तुपात परतलेला कांदा, सुक्या लाल मिरच्या आणि कुरकुरीत मखाने यांची फोडणी दिल्याने त्याची चव आणखी खुलते.

बेगुन रेझाला बनवण्यासाठी दोन मध्यम आकाराची हिरवी वांगी, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, दोन कांदे, एक इंच आले, पाच ते सहा लसूण पाकळ्या, दोन ते तीन हिरव्या मिरच्या, दोन वेलची, दालचिनीचा छोटा तुकडा, पाच ते सहा काळी मिरीचे दाणे, तीन ते चार चमचे दही, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धणेपूड, दोन ते तीन चमचे पांढरे तीळ, सात ते आठ काजू, अर्धा कप दूध, एक मोठा चमचा तूप, दोन सुक्या लाल मिरच्या, दहा ते बारा मखाने आणि आवश्यकतेनुसार तेल घ्या.

सर्वप्रथम वांगी धुऊन लांबट किंवा जाड गोल काप करून घ्या. त्यांना मीठ आणि थोडी साखर लावून काही वेळ बाजूला ठेवा. त्यानंतर कढईत तेल गरम करून वांग्यांचे तुकडे दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. एका कांद्यासोबत आले, लसूण आणि हिरव्या मिरच्या थोड्या पाण्यात उकळून घ्या. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार करा. दुसरीकडे, काजू, पांढरे तीळ आणि दूध एकत्र वाटून गुळगुळीत पेस्ट बनवा. आता कढईत थोडे तेल गरम करून त्यात वेलची, दालचिनी आणि काळी मिरी परता. त्यानंतर कांदा-आले-लसूण पेस्ट घालून तिचा कच्चा वास जाईपर्यंत शिजवा. त्यात जिरेपूड आणि धणेपूड मिसळा.

यानंतर दही चांगले फेटून त्यात घाला आणि मिश्रण सतत ढवळत मंद आचेवर शिजवा. दही फाटणार नाही याची काळजी घ्या. आता काजू-तीळ-दुधाची पेस्ट घालून सर्व साहित्य एकजीव करा. ग्रेव्ही आवश्यकतेनुसार घट्ट करण्यासाठी थोडे पाणी घालता येईल. त्यात तळलेली वांगी टाकून हलक्या हाताने मिसळा आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनिटे शिजवा. शेवटी, एका छोट्या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात उरलेला चिरलेला कांदा सोनेरी होईपर्यंत परता.त्यात सुक्या लाल मिरच्या आणि मखाने घालून कुरकुरीत होऊ द्या. ही फोडणी तयार बेगुन रेझाल्यावर घाला. गरमागरम रोटी, पराठे किंवा पुलावसोबत हा बंगाली पदार्थ सर्व्ह करा. दही-काजूच्या मलईदार ग्रेव्हीमुळे आणि सुगंधी तुपाच्या फोडणीमुळे साध्या जेवणालाही खास मेजवानीची चव मिळेल.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय