31 ऑक्टो. 2026, 20:39

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

कृष्णाची शिकवण ही मानवाच्या उत्थानासाठी प्रेरक ठरते: धनंजय गोखले

कृष्णाची शिकवण ही मानवाच्या उत्थानासाठी प्रेरक ठरते: धनंजय गोखले
तरुण भारत

गीतेतून भगवान कृष्णाने संभ्रमित अर्जुनाला उपदेश केला असला तरी समग्र मानव जातीसाठी ते कर्तव्यनिष्ठ जीवन जगण्याचे सार ठरले आहे. कृष्णाच्या उपदेशाने अर्जुन द्विधा मनस्थितीतून मोकळा झाला. त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. कृष्णाने दिलेले ज्ञान हे वैयक्तिक अर्जुनासाठी असले तरी मानव जातीच्या उत्थानासाठी ते प्रेरक ठरत आहे. असे मत पुणे येथील धनंजय गोखले यांनी मांडले. ते कारंजा येथील कै.नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत कृष्णाची वॉर्निंग: शिक्षणाशिवाय पर्याय नाही या विषयावर बोलत होते.

प्रारंभ डॉ.अजय कांत व एम. टी. खान यांनी वत्याचे स्वागत केले. तर प्रमुख अतिथी मानसी सोमण यांचे स्वागत स्वाती कडू यांनी केले. संजय ईहरे यांनी वत्याचा परिचय करून दिला. शिकणं या प्रक्रियेविषयी बोलताना गोखले पुढे म्हणाले की, शिकणे म्हणजे केवळ ज्ञान संपादन करणे नाही. तर स्वतःमध्ये अमर्यादक्षमता निर्माण करण्याची ती एक प्रक्रिया आहे. तुम्हाला कोणी शिकवू शकत नाही तर तुम्हाला स्वतः पुढाकार घेऊन शिकावे लागेल.जन्मानंतर श्वास कसा घ्यावा, चालावे कसे, बोलावे कसे हे आपल्यातील क्षमतेने आपण शिकत असतो. शिकताना शिष्यत्व व अशिष्यत्व हे दोन विरोधी तत्व असल्याचे त्यांनी सांगितले. यातील शिष्यत्वामध्ये निष्ठावंत व श्रद्धावंत असणे, गुणग्राही असणे असे एकूण ५२ गुण सांगितले आहे तर आशिष्यत्व धारण करणारा व्यक्ती हा श्रद्धावान नसणारा, क्षमता नसणारा, प्रयास न करणारा असतो. अशावेळी आपण शिष्यत्वाला शिकवणं निरर्थक ठरते. त्यामुळे त्याला प्रथम शिष्य बनविणे श्रेयस्कर ठरते. केवळ पाठांतरामुळे मोठा झालेला माणूस हा सक्षम असू शकत नाही. प्रत्यक्षात अनुभव घेतलेला ,साधना केलेला माणूस खर्‍या अर्थाने मोठा बनू शकतो. आपण देवा पुढे दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याचे दिव्यत्व जो अंगी बाळगू शकतो किंवा पाण्यात उडी मारून जो पोहणे शिकू शकतो तोच स्वतःहून काहीतरी शिकत असतो, म्हणून कृष्णाने वार्निंग दिली आहे की, शिका नाही तर नष्ट व्हा. आपल्या शांतता हवी असेल तर ती तशी मिळणार नाही तर तुम्हाला अशांतता दूर करावी लागेल. घरात, परिसरात स्वच्छता लागत असेल तर तुम्हाला अस्वच्छता दूर करावी लागेल. लक्ष्मीला प्राप्त करायचे असेल तर लक्ष्मीला दूर करावे लागेल. गीता हा भगवान कृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद आहे.प्रत्येकाचे मन द्विधा मनस्थितीत असू शकते.कारण आपण सारे अर्जुन आहोत.त्यामुळे भागवत गीता रोज घडत असते. फक्त आपल्याला तशी दृष्टी पाहिजे.. हे समजून सांगताना एखाद्या विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नसेल तर तुम्हाला कृष्णाची भूमिका पार पाडावी लागेल. त्याच्याशी संवाद साधून त्याला अभ्यासाकडे वळवावा लागेल. त्याच्या पाठीवर हात ठेवून तुला जमेल, तू करशील. अशी जाणीव त्याच्यामध्ये निर्माण करावी लागेल तर तो अभ्यासाकडे प्रवृत्त होऊ शकेल म्हणून शिष्य बनण्याचा प्रयत्न करा असा कृष्णाचा संदेश आहे.असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचलन व आभार गोपाल कडू यांनी केले.तर डॉ.सुशील देशपांडे यांनी शारदा स्तवन म्हटले.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय