हिंगणघाट बसस्थानकात एसटी चालक-वाहकाला मारहाण!
तिघांना अटक

आर्वी ते चंद्रपूर मार्गावर धावणार्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये महिला प्रवाशासोबत झालेल्या वादातून हिंगणघाट बसस्थानकात चालक आणि वाहकाला मारहाण करण्यात आली. या मारहाणीत वाहकाच्या नाकाला दुखापत झाली असून चालकही किरकोळ जखमी झाला. परिवहन मंडळाच्या वतीन दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांना अटक केली.
वर्धा विभागातील आर्वी आगाराची एम. एच. १४ एल. एक्स. ८५४० क्रमांकाची बस आर्वी ते चंद्रपूर मार्गावर प्रवासी घेऊन जात होती. २१ रोजी बस हिंगणघाट बसस्थानकावर पोहोचली. दरम्यान, बसमधील एका महिला प्रवाशाने चालक आणि वाहकांनी त्रास दिल्याचे सांगून तीन जणांना बोलावले. संबंधितांनी या घटनेची शहानिशा न करता चालक आणि वाहकाला मारहाण करण्यास सुरुवात केली.
या मारहाणीत वाहक शुभम डहाके याच्या नाकाला दुखापत झाली तर चालक गणेश खेळकर याला किरकोळ दुखापत झाली. घटनेनंतर हिंगणघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणातील तिघांनाही अटक केली आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
