गोरवाडा जूच्या गेटजवळ भीषण अपघात
१९ वर्षीय बीटेक विद्यार्थ्याचा मृत्यू

शहरातील गोरवाडा प्राणिसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण रस्ते अपघातात १९ वर्षीय बीटेक विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. युवराज राजेंद्र मोहाडीकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, आशीष पटेल असे जखमीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सुमारे ४.१५ वाजताच्या सुमारास युवराज आणि आशीष हे दोघे मोपेडने महाविद्यालयातून घरी परतत होते. दरम्यान, गोरवाडा जूच्या प्रवेशद्वाराजवळ एका कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या मोपेडवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले.
या अपघातात युवराजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर आशीष पटेल हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मृत युवराज मोहाडीकर हा देहगाव येथील रहिवासी होता. तो काटोल मार्गावरील गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे बीटेकचे शिक्षण घेत होता. त्याचा मित्र आशीष पटेल हा जरीपटका परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. युवराजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या अपघातामागील नेमकी कारणे आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पोलीस तपास करीत आहेत.तरुण वयातच युवराजचा झालेला मृत्यू ही त्याच्या कुटुंबीयांसाठी मोठी आघातकारक घटना ठरली आहे. एका चुकीच्या ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
