31 ऑक्टो. 2026, 20:39

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

गोंदियातील १.२१ लाख शेतकर्‍यांना दुष्काळाचा ‘फटका’!

- ३९,९८४ हेक्टरवरील पीक बाधित - शेतकर्‍यांसाठी ५७.८७ कोटींच्या मदतीची मागणी

गोंदियातील १.२१ लाख शेतकर्‍यांना दुष्काळाचा ‘फटका’!
तरुण भारत

यंदाच्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकर्‍यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पावसाच्या अनियमिततेचा आणि पाणीटंचाईचा परिणाम शेतीवर झाला असून, जिल्ह्यातील १ लाख २१ हजार ४८४ शेतकर्‍यांचे एकूण ३९ हजार ९८४.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी शासनाकडे ५७ कोटी ८७ लाख ९६ हजार २९५ रुपयांच्या निधीची मागणी केली आहे.

खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाल्याने शेतकर्‍यांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असून, पुढील हंगामाच्या तयारीसाठीही त्यांना आर्थिक आधाराची गरज आहे. दरम्यान, तालुकानिहाय आकडेवारीनुसार गोंदिया तालुक्यात ५४ हजार ७९८ शेतकर्‍यांचे १६ हजार ६७१.२१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी २८ कोटी ३४ लाख १० हजार ५७० रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात आली आहे. तर तिरोडा तालुक्यातील ३३ हजार ९७७७ शेतकर्‍यांचे १२ हजार २२८.०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, २० कोटी ७८ लाख ८९ हजार ४३० रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. या दोन तालुक्यांतील शेतकर्‍यांची संख्या आणि बाधित क्षेत्र लक्षात घेता, जिल्ह्यातील पीक नुकसानीचा मोठा भार या भागांवर पडल्याचे स्पष्ट होते. त्याचबरोबर आमगाव तालुक्यात १९ हजार ३३४ शेतकर्‍यांचे ४ हजार ५९८.६० हेक्टर, तर देवरी तालुक्यातील ८ हजार ९९४ शेतकर्‍यांचे ४ हजार १०५.०८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.सालेकसा, सडक-अर्जुनी, अर्जुनी-मोरगाव आणि गोरेगाव तालुक्यांतील नुकसानीचाही अहवालात समावेश आहे. खरीप हंगामातील नुकसान, आगामी रब्बी हंगामाची तयारी आणि पशुधनाच्या संगोपनाचा खर्च अशा अनेक बाबींचा सामना शेतकर्‍यांना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदत त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना दिलासा मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने मदतीची मागणी करणारा अहवाल शासनाकडे सादर केला आहे. आता या मागणीवर शासनाकडून निधी मंजूर होऊन प्रत्यक्ष मदत लवकरात लवकर मिळावी यासाठी प्रशासनाकडून पाठपुरावा होत आहे.

- मंदार पत्की, जिल्हाधिकारी, गोंदिया

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय