गंगेच्या तीरावर लढाऊ विमानांची गर्जना!
९४ व्या स्थापना दिनानिमित्त "विंग्स ओव्हर गंगा" सोहळा संपन्न

भारतीय हवाई दलाच्या ९४ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून आज वाराणसीच्या ऐतिहासिक नमो घाटावर 'विंग्स ओव्हर गंगा' या भव्य हवाई प्रदर्शनाचा थरार पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, हवाई दल प्रमुख यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या साक्षीने भारतीय हवाई दलाने आपल्या अफाट लढाऊ क्षमतेचे, आधुनिकीकरणाचे आणि तांत्रिक सज्जतेचे अभूतपूर्व दर्शन घडवले. सकाळी ११:४० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान मोदी यांनी उपस्थिती दर्शवली.
देशभरातील १२ विविध हवाई तळांवरून आलेल्या सुमारे १०० लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर्स आणि वाहतूक विमानांनी या प्रात्यक्षिकांमध्ये भाग घेतला. याद्वारे भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांमधील अद्भूत समन्वयाचे प्रदर्शन करण्यात आले. या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे सुखोई-३० एमकेआय, राफेल, जग्वार, मिराज-२०००, एलसीए तेजस आणि मिग-२९ या सहा अत्याधुनिक लढाऊ विमानांनी पहिल्यांदाच हवेत घेतलेली 'बाणासारखी' (Arrowhead) रचना होती. या विमानांनी 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये वापरण्यात आलेल्या काही घातक शस्त्रांची झलक दाखवून देशाच्या संरक्षण सज्जतेची चुणूक दाखवून दिली.
कार्यक्रमा दरम्यान गंगेच्या पात्रावर आभासी हवाई युद्धाचा थरारक अनुभव प्रेक्षकांना आला. मालवीय पुलावरून दोन जग्वार विमानांनी केलेल्या वेगवान हल्ल्याला सुखोई-३० एमकेआय विमानाने हवेतच रोखून (इंटरसेप्ट) दाखवले. एका सुखोई विमानाने ८,००० फूट उंचीवरून इन्फ्रारेड कॅमेऱ्यांच्या सहाय्याने या थराराचे चित्रीकरण केले. याशिवाय, चेन्नईहून उड्डाण केलेल्या नौदलाच्या 'पी-८आय' विमानाने ग्वाल्हेर येथे मिराज-२००० सोबत यशस्वी समन्वय साधत वाराणसी गाठले. शेवटी, हवाई दलाच्या 'सूर्यकिरण' आणि 'सारंग' हेलिकॉप्टर पथकाने सादर केलेल्या नेत्रदीपक कसरतींनी उपस्थितांची मने जिंकली.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
