31 ऑक्टो. 2026, 20:38

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

दुष्काळाशी लढण्याकरिता ‘जलतारा’ देणार ‘बळ’

प्रशासन सज्ज : ८.३३ लाख मनुष्यदिनाची होणार रोजगार निर्मिती

दुष्काळाशी लढण्याकरिता ‘जलतारा’ देणार ‘बळ’
तरुण भारत

दुष्काळाच्या कठीण प्रसंगी मात करण्यासह होतकरूंच्या हाताला काम मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आतापासूनच नियोजन केले जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक ग्रापंने जलताराची १०० कामे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. जिल्ह्यातील ५२१ ग्रापंत आगामी काळात या कामांतून तब्बल ८.३३ लाख मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती होणार आहे.

पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संगोपन करून ते जमिनीत मुरावे याकरिता जलतारा हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ठरतो. दुष्काळाच्या झळा मजुरांनाही सोसाव्या लागणार आहे. अशा स्थितीत दुष्काळाशी लढा देणे आणि भविष्यात पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरावा हा उद्देश असलेल्या जलताराची प्रत्येक ग्रामपंचायतींनी १०० कामे हाती घ्यावे, अशा सूचना जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी आठही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना दिल्या आहेत. येत्या काळात या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून व्हीबीजी-रामजी योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठही तालुयांत प्रामुख्याने ग्रामीण भागात जलसंधारणाची ही कामे केली जाणार आहे. या कामांमुळे ग्रामीण भागातील होतकरुंना गावातच काम मिळणार आहे.

व्हीबीजी रामजी योजनेंतर्गत विविध कामे जिल्ह्यात केली जाणार आहेत. सन २०२६-२७ ते सन २०३०-३१ या पाच वर्षांच्या काळात ग्रापंच्या माध्यमातून ११ हजार ४७९ कामे करण्यास प्रशासनाने मंजुरी दिली आहे. या कामातून २० लाख ३७ हजार ४४० मनुष्यदिन रोजगाराची निर्मिती होणार आहे. यापैकी जास्तीत जास्त कामे यंदाच्या दुष्काळी काळात पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा असल्याचे सांगण्यात आले. व्हीबीजी-रामजी योजनेंतर्गत रोजगारासाठी पात्र ठरणार्‍या प्रत्येक लाभार्थ्याला काम देण्यासाठी जिपच्या वतीने प्रयत्न होणार आहे. नोंदणीकृत मजुराने कामाची मागणी नोंदविताच झटपट त्यावर कार्यवाही करून काम उपलब्ध करून दिले जाणार आहे.

८७२२ कामे प्रगतीपथावर

व्हीबीजी-रामजी योजनेंतर्गत जिल्ह्यात सध्या ८ हजार ७२२ विविध कामे प्रगतीपथावर आहेत तर दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिपच्या पंचायत विभागाकडून ५ हजार ७६२ कामांचा प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांना सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.

मागेल त्याला काम : डॉ. फसणे

होतकरू ग्रामीणांना गावातच काम मिळावे हा त्यामागील उद्देश आहे. मागेल त्याला काम उपलब्ध करून दिले जाणार असल्याची प्रतिक्रीया उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानदा फणसे यांनी दिली.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय