1 नोव्हें. 2026, 01:58

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

दुहेरी हत्याकांडाने खळबळ! पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या

दुहेरी हत्याकांडाने खळबळ! पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या
तरुण भारत

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात कौटुंबिक वादातून घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने परिसर हादरला आहे. अष्टाणे गावात एका पतीने आपल्या २८ वर्षीय पत्नी आणि अवघ्या तीन वर्षांच्या मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर गावात खळबळ उडाली असून, माय-लेकरांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नागेश ठाकरे असे संशयित पतीचे नाव असून, बाईचीबाई ठाकरे असे मृत महिलेचे, तर रोहित असे तिच्या तीन वर्षांच्या मुलाचे नाव आहे. कौटुंबिक वादातून नागेश याने पत्नी आणि मुलावर दगडाने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील दोन जणांचा अशा प्रकारे अंत झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

पत्नी आणि मुलाची हत्या केल्यानंतर संशयित नागेश याने स्वतःलाही जखमी करून घेतल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी नागेश याला उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात आले आहे.या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण आणि घटनेचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्यासाठी साक्री पोलीस अधिक तपास करत आहेत. कौटुंबिक वादातून घडलेल्या या भीषण घटनेमुळे अष्टाणे गावासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय