31 ऑक्टो. 2026, 22:34

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

दिल्लीतील शाळेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

तीन पानी चिठ्ठीतून महत्त्वाचे तपशील उघड

दिल्लीतील शाळेत बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
तरुण भारत

दिल्लीतील कृष्णा नगर परिसरात बारावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने शाळेच्या आवारात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली. शाळेतील गार्ड रूमच्या मागील बाजूस ती गंभीररीत्या भाजलेल्या अवस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून दिल्ली पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांना शाळेत आग लागल्याची माहिती देणारा पीसीआर कॉल मिळाल्यानंतर कृष्णा नगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी सुमारे १८ वर्षांची ही विद्यार्थिनी गार्ड रूमच्या मागे जळालेल्या अवस्थेत आढळली. तिची शाळेची बॅगही जळालेली होती. घटनास्थळावरून पोलिसांनी बॅगेसह काही महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. विद्यार्थिनीच्या बॅगेत ज्वलनशील पदार्थ आढळल्याची माहितीही पोलिसांनी दिली.

या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांना विद्यार्थिनीने लिहिलेल्या तीन पानी आत्महत्येच्या चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठ्यांमध्ये तिने आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकली नसल्याची भावना व्यक्त केल्याचे समोर आले आहे. तसेच, एका मुलाचा उल्लेख असल्याने पोलिसांकडून प्रेमप्रकरणाच्या शक्यतेचाही तपास केला जात आहे. चिठ्ठीतील अन्य उल्लेखांमध्ये मैत्रिणीने दुसऱ्या मुलीशी संवाद साधल्याचा संदर्भ असल्याची माहितीही समोर आली आहे. या सर्व बाबींची सत्यता पडताळून पाहण्याचे काम पोलीस करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी सहावा तास संपल्यानंतर वर्गाचा पास घेऊन पाणी पिण्यासाठी गेली होती. त्यानंतर अवघ्या दोन ते तीन मिनिटांत तिच्या किंकाळ्या ऐकू आल्याचे सांगितले जाते. ती पाण्याच्या टाकीजवळ पूर्णपणे भाजलेल्या अवस्थेत आढळली. प्राथमिक तपासात तिने काही रसायन प्राशन करून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मृत विद्यार्थिनी मूळची गोंडली गावची रहिवासी होती. ती दिल्लीत आपल्या बहिणीसोबत राहत होती, तर तिचे आई-वडील गावात राहतात. घटनास्थळाची तपासणी करून पुरावे गोळा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच, घटनास्थळी न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (एफएसएल) पथकानेही तपासणी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, या घटनेला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा शोध घेतला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली सरकारचे मंत्री आशिष सूद यांनी संबंधित शाळेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस तपास सुरू असल्याचे सांगितले. शाळा प्रशासनाने पोलिसांना आवश्यक ते सर्व पुरावे उपलब्ध करून दिले आहेत. ही अत्यंत दुःखद घटना असून, तपास पूर्ण झाल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल, असे सूद यांनी स्पष्ट केले.विद्यार्थिनीच्या मृत्यूमुळे शाळा परिसरात चिंता आणि घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. आत्महत्येमागील नेमके कारण, चिठ्ठ्यांमधील उल्लेखांचा अर्थ आणि घटनाक्रम यांचा उलगडा करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय