31 ऑक्टो. 2026, 20:38

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

ब्राम्हणवाडा येथे विवाहितेचा गळा आवळून खून

वडिलांनीच मुलीची हत्या केल्याचा आरोप

ब्राम्हणवाडा येथे विवाहितेचा गळा आवळून खून
तरुण भारत

मालेगाव तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे ३५ वर्षीय विवाहितेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी तिच्या वडिलांविरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रेमसंबंधांमुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून ही हत्या केल्याचा आरोप आहे. ही घटना २० ऑटोबरच्या रात्री घडली. तब्बल सहा दिवसांनंतर २६ ऑटोबर रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेचे नाव मनीषा उमेश नायकवाल वय ३५, राहणार कारेगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली असे आहे. पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मनीषा हिचे केसापूर येथील सोपान शिंदे याच्यासोबत प्रेमसंबंध होते. यामुळे ती पतीला सोडून त्याच्यासोबत निघून गेली होती. या प्रकारामुळे समाजात बदनामी होत असल्याच्या कारणावरून मनीषाचे वडील संतोष मारोती गोटे वय ५२, राहणार ब्राम्हणवाडा यांनी २० ऑटोबरच्या रात्री सुमारे एक वाजताच्या दरम्यान शॉलने गळा आवळून तिचा खून केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मृत मनीषाची आई वर्षा संतोष गोटे वय ४५ यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, घटनेनंतर त्या प्रचंड घाबरल्या होत्या.त्यामुळे त्यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दिली नव्हती. २६ ऑटोबर रोजी पोलिसांनी मनीषाबाबत चौकशी करण्यासाठी त्यांच्याकडे विचारणा केली. यावेळी पोलिसांनी त्यांना सुरक्षिततेची हमी दिल्यानंतर त्यांनी घटनेची सत्य माहिती सांगण्याचे धाडस केले. त्यानंतर त्यांनी शिरपूर पोलिस ठाण्यात जाऊन पती संतोष गोटे यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.

वर्षा गोटे यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), २३८, ११५(२) आणि ३५१(२), ३५१(३) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार आणि शिरपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांनी घटनास्थळाला भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार योगिता भारद्वाज स्वतः करीत आहेत.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय