भारतात कुठेही लपलेल्या आरोपींना बेड्या ठोकणार !
फल्लीला तामिलनाडू तर अभिषेक गँगला युपीतून अटक

गुन्हा केल्यानंतर अनेक आरोपी अन्य राज्यात पळून जातात. मात्र, आरोपी भारतातील कोणत्याही कानाकोपऱ्यात दडून बसले तरी त्याला शोधून काढून बेड्या ठोकणार. गुन्हेगारी रोकण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी नागपूर पोलिस सज्ज आहेत. त्यामुळे गुन्हा केल्यानंतर पळून गेलेल्या आरोपींचा सुक्ष्म पद्धतीने शोध घेऊन अटक करण्यात येईल, अशी आक्रमक भूमिका पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आयुक्तालयात आयोजित पत्रपरिषदेत मांडली. कुख्यात आरोपी फल्ली ऊर्फ विशाल गुप्ता याला तामिलनाडू तर अभिषेक सिंगच्या दरोडेखोराच्या गँगला राजस्थान आणि उत्तरप्रदेशातून अटक केली, हे विशेष.
पोलिस आयुक्त नांगरे पाटील पुढे म्हणाले की, संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ३३ गुन्हेगारांवर मकोका लावला. त्यात अमली पदार्थ तस्करांविरुद्धच्या पाच कारवायांचा समावेश आहे. तस्करीच्या संघटित टोळ्या, त्यांचे सूत्रधार आणि साथीदारांना लक्ष्य करण्यासाठी मकोकाचा वापर केला जात २०२५ या संपूर्ण वर्षात अमली पदार्थांशी संबंधित ५९८ गुन्हे दाखल झाले होते. त्यात ३७२ आरोपींना अटक करून ५ कोटी २ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. मात्र, २०२६ मध्ये ऑक्टोबरपर्यंतच गुन्ह्यांची संख्या ७३५, अटक केलेल्या आरोपींची संख्या ८९० आणि जप्त अमली पदार्थांचे मूल्य ९ कोटी ६९ लाख रुपयांवर पोहोचले आहे. या कारवाईत १३.०४७ किलो एमडी, ८३०.१८२ किलो गांजा, १७० ग्रॅम एलएसडी आणि ५३ ग्रॅम हेरॉइन जप्त करण्यात आले, अशी माहिती आयुक्त नांगरे पाटील यांनी दिली. यावेळी नवीनचंद्र रेड्डी, डीसीपी दीपक अग्रवाल आणि एसीपी वैभव जाधव उपस्थित होते.
प्रेयसीमुळे फल्लीला अटक
एमडी तस्करीतील आरोपी विशाल ऊर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता आणि प्रेयसी सहेली पंधराम ऊर्फ सोनू यांना तामिळनाडूतील रामेश्वरम येथून अटक केली. या दोघांचा पोलिसांनी १,९०० किलोमीटर पाठलाग केला. सोनूने इंस्टावर फोटो अपलोड केल्यामुळे फल्ली पोलिसांच्या हाती लागला. गुप्ता हा एनडीपीएस प्रकरणासह नगरसेवक शुभम मोघरे यांच्याशी संबंधित गोळीबार प्रकरणातील मकोका गुन्ह्यातही हवा होता. नरेंद्रनगरातील १ कोटी ५४ लाख रुपयांचे एमडी जप्त करण्यात आलेल्या प्रकरणातही या दोघांचा सहभाग आहे. दोघांना ट्रान्झिट रिमांडवर नागपूरला आणले जात आहे.
नोकरानेच आखला घरफोडीचा कट
फ्रेंड्स कॉलनी परिसरात २३ ऑक्टोबरला झालेल्या घरातील लुटीचा छडाही पोलिसांनी लावला. या प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. चार आरोपींनी चाकू आणि खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून महिला व तिच्या १४ वर्षीय मुलाला धमकावले आणि दोन मोबाइल घेऊन पलायन केले होते. पतीकडे असलेला नोकर सुमेध ऊर्फ छोटा राजकुमार सोमकुवर (३२) यानेच लुटीचा कट रचला होता. चोरीचे मोबाइल, बनावट बंदूक आणि तीन दुचाकी असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
