31 ऑक्टो. 2026, 20:39

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांची जागतिक स्तरावर भरारी

‘वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ स्पर्धेत पटकावले विजेतेपद

बदलापूरच्या सिताराम राऊळ यांची जागतिक स्तरावर भरारी
तरुण भारत

महाराष्ट्रातील बदलापूरचे छायाचित्रकार सिताराम राऊळ यांनी जागतिक स्तरावरील वन्यजीव छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे आयोजित ‘वाइल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर’ या प्रतिष्ठित स्पर्धेत त्यांनी श्रेणी विजेतेपद पटकावले. वन्यजीव छायाचित्रण क्षेत्रातील मानाच्या स्पर्धांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत जगभरातून ५९ हजारांहून अधिक छायाचित्रे सहभागी झाली होती. त्यातून राऊळ यांच्या छायाचित्राची विजेतेपदासाठी निवड करण्यात आली.

सिताराम राऊळ यांना ‘Invertebrates: Behaviour’ अर्थात अपृष्ठवंशीय प्राण्यांचे वर्तन या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला. त्यांनी टिपलेल्या ‘Shifting Sands’ या छायाचित्रात राजस्थानमधील थार वाळवंटातील एका विंचवाचे वर्तन चित्रित करण्यात आले आहे. जैसलमेर येथे टिपलेल्या या छायाचित्रात विंचू स्वतःच्या निवाऱ्यासाठी वाळूत खड्डा खोदताना दिसतो. प्रतिकूल परिस्थितीतही लहान जीव जगण्यासाठी कसा प्रयत्न करतात, याचे प्रभावी दर्शन या छायाचित्रातून घडते.

मॅक्रो फोटोग्राफीच्या माध्यमातून निसर्गातील सूक्ष्म जीवांच्या हालचाली टिपण्यावर राऊळ यांचा भर असतो. त्यांच्या छायाचित्रांमधून निसर्गातील दुर्लक्षित पैलू जवळून पाहण्याची संधी मिळते. ‘Shifting Sands’ या छायाचित्राच्या निवडीमुळे त्यांच्या निरीक्षणशक्तीला आणि छायाचित्रणातील कौशल्याला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.लंडनमध्ये पुरस्कार स्वीकारल्यानंतर सिताराम राऊळ यांनी संपूर्ण भाषण मराठीतून केले. यावेळी त्यांनी भारतात विविध ठिकाणी फिरताना आलेल्या अनुभवांचा उल्लेख केला. ‘भारतात मी ज्या-ज्या ठिकाणी फिरलो, तिथली सर्व माणसं प्रेमळ आणि पाहुण्यांचा आदरातिथ्य करणारी होती. हा मला मिळालेला पुरस्कार तुमच्यामुळेच शक्य झाला आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जागतिक व्यासपीठावर मराठीतून भाषण करत त्यांनी आपल्या मातृभाषेचा अभिमानही व्यक्त केला. त्यांच्या या यशामुळे बदलापूरसह महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय