अभिजित वंजारींचा विजय जवळपास निश्चित

निकालाची अधिकृत घोषणा नाही
मतमोजणीचा ४० तासांचा थरार
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा निकाल पहिल्या पसंतीने नाही, तर दुसऱ्या पसंतीने लागण्याची शक्यता आहे. ४० तास, ३५ बाद फेऱ्यांपर्यंत कुणालाही विजयाचा कोटा पूर्ण करता आला नाही. मात्र ३६ व्या बादफेरीनंतर अभिजित वंजारी यांचा विजय निश्चित मानला जात होता. पण त्याची अधिकृत घोषणा वृत्त लिहिस्तोवर झाली नव्हती. काँग्रेसचे अभिजित वंजारी दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या भरोशावर विजयाच्या उंबरठ्यावर होते.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या मतमोजणीच्या ३५ व्या बादफेरीअखेरच्या अधिकृत आकडेवारीनुसार सुधाकर कोहळे (भाजपा) - ६१,७३४ मते - आघाडीवर, अभिजित वंजारी (काँग्रेस) - ५८,५०४ मते - ३,२३० मतांनी पिछाडीवर, तर नीतेश कराळे (अपक्ष) - २६,०६६ मते घेऊन बाद ठरले होते. पहिल्या पसंतीत कोहळे ४,२९४ मतांनी आघाडीवर होते. ३४ व्या फेरीपर्यंत ही आघाडी ३,९१४ होती. ३५ व्या फेरीनंतर ती ३,२३० वर आली. म्हणजे वंजारी माघारले होते, पण वेगाने आघाडी कमी करीत होते. ३६ व्या फेरीनंतरच निकाल हाती येणार होता.
दुसरी पसंती म्हणजे काय?
पदवीधर निवडणुकीत मतदारांना उमेदवारासमोर १, २, ३ असे पसंतिक्रम लिहावे लागतात. १ म्हणजे मतदाराची पहिली पसंती. जर मतदाराच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराला ५० टक्क्यांचा कोटा पूर्ण करता आला नाही, तर सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवाराला बाद केले जाते आणि त्याच्या मतपत्रिकेवर दुसरी पसंती म्हणून कोणाचे नाव आहे, हे पाहिले जाते आणि ती मते त्या उमेदवाराला दिली जातात. म्हणजे मतदाराचे मत वाया जात नाही, ते दुसऱ्या पसंतीकडे जाते.
३५ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार संजय थूल हे ३,०९१ मते घेऊन बाद झाले. त्यांची ३,०९१ मते बाद झाली. त्यापैकी वंजारी यांना - २,१८० मते (७० टक्के), कोहळे यांना ७२० मते (२३ टक्के) तर १९१ मते बाद झाली. एका फेरीत वंजारी यांनी १,४६० मतांची पिछाडी भरून काढली. फरक ३,९१४ वरून ३,२३० वर आला.
- नीतेश कराळे ठरले जायंट कीलर
कराळे हे शिक्षक नेते आहेत. त्यांनी २६,०६६ मते घेतली. मानकापूर केंद्रातील माहितीनुसार, कराळे यांच्या २६,०६६ पैकी १८,००० मतपत्रिकांवर दुसरी पसंती लिहिलेली होती आणि त्यापैकी ६८ टक्के म्हणजे १२,००० ते १५,००० मते वंजारी यांना गेली. म्हणजे ३६ व्या फेरीत वंजारी यांना १४,६५० पेक्षा जास्त मते मिळण्याची शक्यता होती.
अधिकृत घोषणा नाही, पण गुलालाची उधळण
मध्यरात्री २ वाजतापर्यंत अधिकृत घोषणा झालेली नव्हती. निवडणूक अधिकारी म्हणत होते, ३६ वी फेरी पूर्ण होऊनही प्रत्येक मतपत्रिका तपासावी लागते. अंतिम निकाल पहाटे ४ ते ५ वाजेपर्यंत हाती येईल. मात्र मानकापूर स्टेडियमबाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळला, फटाके फोडले, ढोल वाजविला. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण जल्लोष थांबला नाही. सोशल मीडियावर वंजारी यांच्या विजयाचे बॅनर फिरू लागले होते.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
