1 नोव्हें. 2026, 01:56

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

अबब... अंगाला चिकटवून गांजाची तस्करी !

अबब... अंगाला चिकटवून गांजाची तस्करी !
तरुण भारत

दोन तस्कर ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

२.९१५ किलो गांजासह १.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

गोंदिय,

गांजाची तस्करी करण्यासाठी अंगावरच प्लास्टिकच्या साहाय्याने गांजा लपवून वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. रेलटोली रेल्वे स्टेशन ते रेस्ट हाऊस मार्गावर २५ ऑक्टोबरच्या रात्री ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून २ किलो ९१५ ग्रॅम गांजा, मोपेड (दुचाकी) व इतर साहित्य असा एकूण १ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोमाजी भागन चौधरी (वय ५२) व लक्ष्मीचंद बघेले (वय ५२), दोघेही रा. शिवणघाट, जिल्हा बालाघाट, मध्य प्रदेश, अशी ताब्यात घेण्यात आलेल्या तस्करांची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिस अधीक्षक गोरख भामरे व अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांनी जिल्ह्यातील गांजाची अवैध वाहतूक व विक्रीविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्त घालत असताना रेलटोली रेल्वे स्टेशन परिसरात दोन इसम दुचाकीने गांजाची वाहतूक करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्टेशन ते रेस्ट हाऊस मार्गावर नाकाबंदी केली.

यावेळी दुचाकीने येणाऱ्या गोमाजी चौधरी व लक्ष्मीचंद बघेले या दोघाना थांबवून झडती घेण्यात आली. त्यांच्या अंगावरील कपड्यांखाली पोट, पाठ व पायाला प्लास्टिकच्या साहाय्याने गांजा चिकटवून लपविल्याचे आढळले. तसेच त्यांच्याकडील पिशवीतील तीन टिफिन डब्यांमध्येही गांजा आढळून आला. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख ४५ हजार ७५० रुपये किमतीचा २ किलो ९१५ ग्रॅम गांजा, २० हजार रुपये किमतीची मोपेड (दुचाकी) आणि २ हजार ५०० रुपयांचे इतर साहित्य, असा १ लाख ६८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात रामनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी दोघानाही रामनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमरदीप खाडे, पोलिस हवालदार राजू मिश्रा, तुलसीदास लुटे, महेश मेहर, प्रकाश गायधने, पोलिस शिपाई राकेश इंदूरकर, कुणाल बारेवार, निखिल मेश्राम आणि चालक पोलिस शिपाई राम खंदारे यांनी केली.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय