नाशिकच्या गोदातीरावर ५०१ नागरिकांचा सामूहिक शंखनाद
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी विश्वविक्रमाचा प्रयत्न

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या स्वागतासाठी नाशिकमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २५ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या सोहळ्यात सामूहिक शंखनाद, ग्रामआरती आणि गोदावरी महाआरती हे प्रमुख आकर्षण ठरत आहेत. याच पार्श्वभूमीवर गोदातीरावर शेकडो नागरिकांनी एकाच वेळी शंखनाद करून कुंभमेळ्याच्या स्वागताचा मंगलमय प्रारंभ केला.
नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर गोदातीरावर सामूहिक शंखनादाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात तब्बल ५०१ नागरिकांनी एकाच वेळी शंखनाद केल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, यासाठी आयोजकांकडून प्रयत्न करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कार्यक्रमस्थळी ३०३ हून अधिक शंख एकाच वेळी वाजवण्यात आले, तर या विक्रमी सोहळ्यासाठी ५५० हून अधिक नागरिक उपस्थित होते. शेकडो शंखांच्या एकत्रित निनादाने संपूर्ण गोदातीर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या या सामूहिक शंखनादामुळे भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. भारतीय धार्मिक परंपरेत शंखनादाला विशेष महत्त्व असून, शुभकार्याची सुरुवात आणि मांगल्याचे प्रतीक म्हणून त्याकडे पाहिले जाते.या सामूहिक शंखनादातून सिंहस्थ कुंभमेळ्याच्या स्वागताचा मंगलमय संदेश देण्यात आला. आगामी काळात होणाऱ्या ग्रामआरती आणि गोदावरी महाआरतीसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे नाशिकमध्ये धार्मिक उत्साहाचे वातावरण अधिकच वाढणार आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
