1 नोव्हें. 2026, 07:12

tarunbharat

सर्च
मुख्य बातम्या

अमित शाहांच्या विधानानंतर बादल यांचे संकेत!

पंजाबमध्ये पुन्हा युतीची चर्चा

अमित शाहांच्या विधानानंतर बादल यांचे संकेत!
तरुण भारत

पंजाबच्या राजकारणात भारतीय जनता पक्ष आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात पुन्हा युती होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी समान विचारधारा असलेल्या पक्षासोबत आघाडी करण्याचे संकेत दिल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. पंजाबच्या राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका मांडली. आम आदमी पक्ष आणि काँग्रेस हे अकाली दलाचे प्रमुख राजकीय विरोधक असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी भाजपचे नाव थेट घेतले नाही. मात्र, समान विचारसरणीच्या पक्षासोबत युती करण्याची शक्यता खुली ठेवल्याने आगामी पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली दल पुन्हा एकत्र येणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच पंजाबमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या या विधानानंतर सुखबीर सिंह बादल यांनी युतीबाबत दिलेले संकेत महत्त्वाचे मानले जात आहेत. अकाली दलाचे महासचिव बिक्रम सिंह मजीठिया यांनीही पंजाबच्या हितासाठी दोन्ही पक्षांची युती ही काळाची गरज असल्याचे यापूर्वी म्हटले होते. तसेच, अकाली दलाच्या नेत्या, माजी केंद्रीय मंत्री आणि भटिंडा येथील खासदार हरसिमरत कौर बादल यांनी संगरूरमधील एका सभेत अशाच प्रकारचे संकेत दिले होते. दुसरीकडे, पंजाब भाजपचे उपाध्यक्ष फतेह जंग बाजवा यांनी पक्ष राज्यातील सर्व ११७ विधानसभा मतदारसंघांत निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले होते. भाजपला युतीमध्ये ‘मोठ्या भावाची’ भूमिका मिळाल्यासच आघाडीचा विचार केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली होती. दरम्यान, संभाव्य युतीवर आम आदमी पक्षाने भाजप आणि अकाली दलावर टीका केली आहे. मात्र, या दोन्ही पक्षांनी अद्याप युतीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

भाजप आणि शिरोमणी अकाली दल हे अनेक वर्षे पंजाबमध्ये एकमेकांचे राजकीय सहकारी होते. मात्र, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांवरून दोन्ही पक्षांमधील संबंध बिघडले आणि युती तुटली. २०२० मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री असलेल्या हरसिमरत कौर बादल यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अकाली दलाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. पुढे २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली दल स्वतंत्रपणे लढले; मात्र दोन्ही पक्षांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. त्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने प्रचंड बहुमत मिळवत पंजाबमध्ये सरकार स्थापन केले. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि अकाली दल पुन्हा जवळ येण्याची शक्यता निर्माण झाल्याने पंजाबमधील राजकीय समीकरणे बदलणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय