पुणे शिक्षक मतदारसंघ : कौस्तुभ गावडे राज्यातील सर्वात तरुण आमदार

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी विजय मिळवत महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीत शिवसेना शिंदे गटाचे पुरस्कृत उमेदवार सचिन सानप यांना पराभूत केले. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या गावडे यांनी अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. कौस्तुभ गावडे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपची ऐतिहासिक बाजी मारली दणदणीत विजयानंतर कौस्तुभ गावडे राज्यातील सर्वात तरुण आमदार ठरले आहे
निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कौस्तुभ गावडे यांना १८ हजार ३८५ मते मिळाली, तर सचिन सानप यांना ११ हजार ९८३ मतांवर समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. प्रमुख प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळवत गावडे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. या निकालामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील भाजपच्या कामगिरीची चर्चा सुरू झाली आहे.
गावडे यांच्या विजयाचे वृत्त समजताच कोल्हापुरातील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला. या विजयाबद्दल कौस्तुभ गावडे यांच्या पत्नी मयुरी गावडे यांनीही आनंद व्यक्त केला. कौस्तुभ गावडे हे राज्यातील सर्वात कमी वयाचे आमदार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ते शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, पराभवानंतर सचिन सानप यांनी कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन केले आणि माध्यमांशी संवाद साधला. या निवडणुकीतील मुख्य लढत आपली आणि भाजपच्या उमेदवाराचीच होती, त्यामुळे मतविभाजनाचा मुद्दा लागू होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीत पैसे वाटल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिक्षकांना बदनाम करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
शिक्षकांनी यावेळी शिक्षक प्रतिनिधी निवडला नाही, याची खंत असल्याचे सानप यांनी नमूद केले. मात्र, निवडणुकीतील पराभवानंतरही शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आपला लढा सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाच्या या निकालानंतर विजयी उमेदवाराच्या पुढील भूमिकेसह शिक्षकांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघात पराभूत झालेल्या भाजपच्या बंडखोर उमेदवार संगीता शिंदे यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळेही चर्चा सुरू असल्याचे वृत्त समोर आले आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
