31 ऑक्टो. 2026, 20:37

tarunbharat

सर्च
राजकारण

‘पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही !

- गोंदिया भाजपचा संताप ः खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन

‘पंतप्रधानांचा अपमान सहन करणार नाही !
तरुण भारत

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ गोंदियात भाजप कार्यकर्त्यांचा संताप रस्त्यावर उतरला. पंतप्रधानांविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जयस्तंभ चौकात जोरदार आंदोलन केले. यावेळी काँग्रेसविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष रोहित अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा क्षेत्रातील भाजप आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जयस्तंभ चौकात एकत्र आले. हातात घोषणांचे फलक आणि मनात संताप व्यक्त करीत कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेतृत्वाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाहता पाहता संपूर्ण जयस्तंभ चौक निषेधाच्या घोषणांनी दुमदुमून गेला. कार्यकर्त्यांनी खर्गे यांच्या वक्तव्याला पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचे सांगत तीव्र निषेध नोंदविला.संतप्त कार्यकर्त्यांनी चौकात मल्लिकार्जुन खर्गे यांच्या पुतळ्याचे दहन करून आपला रोष व्यक्त केला. यावेळी ‘नरेंद्र मोदी जिंदाबाद’, ‘काँग्रेस पार्टी हाय-हाय’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी रोहित अग्रवाल यांनी काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत सांगितले की, राजकीय मतभेद हे आपापल्या जागी आहेत. मात्र, देशाच्या पंतप्रधानांविरोधात असभ्य भाषेचा वापर कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. हा केवळ एका राजकीय वक्तव्याचा विषय नसून पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेशी संबंधित मुद्दा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या आंदोलनाला भाजपचे जिल्हा महामंत्री सुनील केलनका, दीपक कदम, छत्रपाल तुरकर, संजीव कुलकर्णी, विवेक मिश्रा, ऋषिकांत साहू, जिल्हा परिषद सदस्य दीपा चंद्रिकापुरे, आनंदा वाधिवा, नगर परिषद उपाध्यक्ष संतोष पटले, सर्व नगरसेवक तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी आणि युवा मोर्चाचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

जाहीर माफी मागा...

पंतप्रधानांविरोधात करण्यात आलेल्या वक्तव्याच्या मुद्द्यावर भाजप आणि भाजयुमो गप्प बसणार नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले असून मल्लिकार्जुन खर्गे यांनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. अन्यथा आंदोलन अधिक व्यापक आणि तीव्र करण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय