31 ऑक्टो. 2026, 18:33

tarunbharat

सर्च
राजकारण

दिला शब्द पूर्ण केला; आर्वीत २१०० कोटींची गुंतवणूक!

आ. सुमित वानखेडे यांचा पाठपुरावा

दिला शब्द पूर्ण केला; आर्वीत २१०० कोटींची गुंतवणूक!
तरुण भारत

येथील औद्योगिक विकासाच्या इतिहासात एका नव्या सुवर्णपर्वाची भर पडली आहे. महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि नामांकित वरुण बेव्हरेजेस लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे आर्वी एमआयडीसी क्षेत्रात तब्बल २ हजार १०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक होणार आहे. या माध्यमातून स्थानिक युवकांसाठी रोजगाराचे नवे दालन खुले झाले आहे. आर्वीचा चेहरा मोहरा बदलण्याचे शब्द विधानसभा निवडणुकीपूर्वी दिला होता. निवडून आल्यानंतर आ. सुमीत वानखेडे यांनी पाठपुरावा करून आर्वीत विक्रमी गुंतवणुकीसाठी पाठपुरावा केला.

आर्वी एमआयडीसी परिसरातील १२५ एकर जागेवर हा अत्याधुनिक एकात्मिक अन्नप्रक्रिया व एफएमसीजी प्रकल्प उभा राहणार आहे. वरुण बेव्हरेजेसचा भारतातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून याद्वारे पेप्सिकोच्या जागतिक दर्जाच्या शीतपेयांसह पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, फळांचे रस, स्नॅक्स, चिप्स, नूडल्स तसेच दुग्धजन्य पदार्थ जसे दूध, दही, चीज, बटर आणि आईस्क्रीमची निर्मिती केली जाईल. या प्रकल्पातील उत्पादने केवळ देशांतर्गत बाजारपेठेतच नाही, तर जागतिक स्तरावर निर्यातीसाठीही पाठवली जाणार आहेत. यामुळे आर्वीचे नाव जागतिक नकाशावर झळकणार आहे.

या प्रकल्पामुळे परिसरातील शेतकरी, दूध उत्पादक, वाहतूकदार, पॅकेजिंग युनिट्स आणि विविध पुरवठादारांनाही फायदा होणार आहे. स्थानिक स्तरावर फळे आणि दुधाच्या मागणीत प्रचंड वाढ होऊन शेतकरी व कृषी क्षेत्राला सोन्याचे दिवस येणार आहेत.

आर्वीचा विकास हेच ध्येय : आ. वानखेडे

आपण निवडणुकीपूर्वी आवीं विधानसभा मतदार संघाचा चेहरामोहरा बदलण्याचे आश्वासन दिले होते. त्या दृष्टीने आपला अभ्यास सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार असल्याचे सांगून या प्रकल्पासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष आभार मानतो, असे आ. वानखेडे म्हणाले.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय