अमरावतीत मतमोजणीला सुरुवात
पहिला कौल संध्याकाळी हाती येणार

विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाली.सर्व प्रथम मतपेट्या स्ट्रॉंग रूम मधून बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर त्यातील मतपत्रिका एकत्र करण्यात आल्या. या मतपत्रिकांचे २५ - २५ चे गठ्ठे तयार करणे सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यावर पहिल्या पसंतीचे मत ज्या उमेदवाराला मिळाले असेल ती मतपत्रिका त्याच्या डब्यात टाकली जाईल.
याचवेळी अवैध मतपत्रिका देखील बाहेर काढली जाईल. वर्गीकरण झाल्यावर अवैध मते मोजून उरलेल्या वैध मताच्या निम्म्यापेक्षा एक जास्त इतका विजयाचा कोटा निश्चित होईल. त्यानंतर उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच्या मताची मोजणी सुरु होईल. ही पूर्ण झाल्यावरही विजयी मतांचा कोटा कोणताच उमेदवार पूर्ण करू शकला नाही तर पहिल्या पसंतीत शेवटच्या स्थानावर राहिलेल्या उमेदवाराच्या मतपत्रिकेवर अन्य ज्या उमेदवारांना दुसऱ्या पसंतीचे मत मिळाले असेल, ती मते त्या उमेदवारांकडे वर्ग करण्यात येणार आहे. याच पद्धतीने शेवटून एकेका उमेदवाराच्या मतपत्रिकेवरील अन्य उमेदवाराला मिळालेल्या दुसऱ्या पसंतीची मते त्या त्या उमेदवाराला देण्यात येईल. ही प्रक्रिया जो उमेदवार विजयाचा कोटा पूर्ण करेल तो पर्यंत किंवा शेवटी दोन उमेदवार राहिल्यावर ज्याला सर्वाधिक मते आहे, त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यापर्यंत सुरु राहील.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
