31 ऑक्टो. 2026, 21:37

tarunbharat

सर्च
राजकारण

500 कोटीचा आरोप शिंदेंकडून प्रतिआव्हान म्हणाले, “पुरावे दाखवा”

500 कोटीचा आरोप शिंदेंकडून प्रतिआव्हान म्हणाले, “पुरावे दाखवा”
तरुण भारत

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील नारायणगड येथे आयोजित दसरा मेळाव्यात बोलताना जरांगे यांनी, एकनाथ शिंदे यांनी भाजपला आपण जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये दिल्याचे सांगितल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. आता या आरोपांवर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली

नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण राष्ट्रपतींना देण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी जरांगे यांच्या आरोपांना उत्तर दिले. कोणालाही ५०० कोटी रुपये दिलेले नाहीत आणि कोणाकडूनही एवढी रक्कम घेतलेली नाही, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. जरांगे पाटील हे कोणत्या आधारावर असे आरोप करत आहेत, याची त्यांनी आधी खातरजमा करायला हवी होती, असेही त्यांनी नमूद केले.

जरांगे यांच्याकडे आरोपांच्या समर्थनार्थ काही पुरावे असतील, तर ते त्यांनी सादर करावेत. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी होऊन सत्य समोर आले पाहिजे, अशी भूमिका शिंदे यांनी मांडली. मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात जरांगे पाटील मराठा समाजासाठी काम करत होते, तेव्हा आपणही विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, असे त्यांनी सांगितले. गेल्या ६० वर्षांत जे काम झाले नाही, ते आपल्या कार्यकाळात करण्यात आल्याचा दावाही शिंदे यांनी केला. आजही मराठा समाजाचे आरक्षण टिकून असल्याचे सांगत, समाजासाठी काम करणाऱ्या जरांगे यांना आपण मदत केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, जरांगे यांनी आंदोलनासाठी काम करताना राजकीय व्यासपीठ उभे करू नये, असे मतही शिंदे यांनी व्यक्त केले.

दरम्यान, शिंदे यांच्या प्रतिक्रियेनंतर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. जालना जिल्ह्यातील महाकाळा येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता पुराव्यांसह माहिती देणार असल्याचे सांगितले. एकनाथ शिंदे यांनी आपल्याला पैसे दिले आहेत की नाहीत, याचे स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. गुरुवारी मराठा समाजासमोर पुरावे मांडणार असल्याचे जरांगे यांनी ठामपणे सांगितले.

‘लाचार कोण आहे, हे गुरुवारी कळेल,’ असे म्हणत जरांगे यांनी या वादाला आणखी धार दिली. गरीब समाज आजही वेदना सहन करत असल्याचे सांगून त्यांनी आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. ‘तुम्ही आम्हाला काय उध्वस्त करणार? आम्ही आधीच उध्वस्त झालो आहोत,’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.जरांगे पाटील यांच्या ५०० कोटी रुपयांच्या आरोपांनंतर शिवसेना नेत्यांकडून झालेली टीका, एकनाथ शिंदे यांनी दिलेले स्पष्टीकरण आणि आता जरांगे यांनी पुरावे सादर करण्याची केलेली घोषणा यामुळे हा मुद्दा राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. गुरुवारी जरांगे नेमके कोणते पुरावे सादर करतात आणि त्यातून या आरोपांबाबत काय स्पष्ट होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय