31 ऑक्टो. 2026, 19:53

tarunbharat

सर्च
जीवनशैली

वायगावात बालाजी रथयात्रा उत्सव आज

१६३ वर्षांची परंपरा

वायगावात बालाजी रथयात्रा उत्सव आज
तरुण भारत

वायगाव (निपाणी) येथे व्यंकटेश बालाजी भगवान रथोत्सव शनिवार २४ रोजी आयोजित करण्यात आला आहे. १६३ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवासाठी गावात भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. गुरुवारपासूनच उत्सवाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली असून बालाजी दर्शनासह रथयात्रेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यासह परिसरातील गावांमधून भाविक दाखल होत आहेत. एकादशीच्या दिवशी रथातून गावात मिरवणूक काढली जाते. गुरुवारी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली.

त्यानंतर त्रयोदशीला म्हणजेच शनिवारी श्री बालाजींची मूर्ती मुख्य रथात विराजमान करण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गांवरून रथयात्रा काढण्यात येईल. रथयात्रेदरम्यान भाविकांकडून रथ ओढला जातो. भजन-दिंडी, लेझीम आणि टिपरी नृत्य तसेच टाळ-मृदंगाचा गजर या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. ‘हरी नारायण गोविंदा’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघतो.रथोत्सवाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरासमोरील परिसर स्वच्छ करून सड्याने सारवला जातो. रंगीबेरंगी रांगोळ्यांनी गाव सजविले जाते.

सन १८६३ मध्ये सुरू झालेली बालाजी भगवान रथयात्रा आजही पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. दरवर्षी रथ ओढण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, रथोत्सव समितीने भाविकांना शिस्तीत उभे राहून रथ ओढण्याची संधी द्यावी, असे आवाहन केले आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय