‘राइज अँड फॉल २’मध्ये मनीष कश्यपच्या धमक्यांवर सहवाग संतापला
गौतम गुलाटीसोबतच्या वादामुळे सोडला मंच!

‘राइज अँड फॉल २’ या रिअॅलिटी शोमध्ये सध्या स्पर्धकांमधील वाद विकोपाला जाताना दिसत आहेत. बिहारमधील इन्फ्लुएन्सर मनीष कश्यप आणि अभिनेता गौतम गुलाटी यांच्यात वारंवार खटके उडत असून, दोघांमधील शाब्दिक चकमकींची चर्चा रंगली आहे. एकमेकांना शिवीगाळ करण्यापासून ते धमक्या देण्यापर्यंत दोघांची मजल गेली आहे. या वादात आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि शोचा सूत्रसंचालक वीरेंद्र सेहवाग यानेही हस्तक्षेप केला. मनीषच्या धमकीवजा बोलण्यावर सेहवागचा संताप अनावर झाला. दोघांना समजावून सांगूनही वाद थांबत नसल्याचे पाहून त्याने संतापाच्या भरात थेट मंच सोडला.
शोच्या ‘वीकेंड पॉवरप्ले’ या भागात मनीष कश्यप आणि गौतम गुलाटी यांच्यात पुन्हा एकदा जोरदार वाद झाला. हा प्रकार वीरेंद्र सेहवागसमोरच घडला. मनीषकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि त्याची आक्रमक भाषा ऐकून सेहवाग चांगलाच संतापला. त्याने मनीषला त्याच्या वागणुकीवरून खडे बोल सुनावले आणि स्वतःच्या मूळ गावाचा दाखला देत धमक्यांचे राजकारण करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले.
सेहवागने मनीषला सुनावताना दिल्लीतील नजफगढचा उल्लेख केला. तो म्हणाला की, नजफगढ हा दिल्लीतील एक छोटासा परिसर असून, त्याच्या आसपासच्या सुमारे १०० गावांपैकी ५० गावांमध्ये गँगस्टर असल्याचे सांगितले जाते. या भागात पूर्वी टोळ्यांमधील संघर्ष आणि गोळीबाराच्या घटनांच्या बातम्या वारंवार प्रसिद्ध होत असत. मात्र, आपण कधीही आपल्या परिसराचा उल्लेख करून कोणाला धमकावण्याचा प्रयत्न केला नाही, असे सेहवागने ठणकावून सांगितले.
“तुम्हाला माहीत आहे का, मी कुठून आलो आहे? दिल्लीमध्ये नजफगढ नावाचे एक छोटेसे गाव आहे. नजफगढमध्ये जवळपास १०० गावे आहेत आणि त्यापैकी ५० गावांमध्ये गँगस्टर राहतात. जुन्या बातम्या चाळल्या, तर एका गँगस्टरने दुसऱ्या गँगस्टरची हत्या केल्याच्या मथळ्याही पाहायला मिळतील. पण मी कुठून आलो आहे, हे सांगून मी कधी कोणाला धमकावले आहे का? माझ्या परिसरात गोळ्या चालतात, असे मी कधी कोणाला सांगितले आहे का?” अशा शब्दांत सेहवागने मनीषला सुनावले. आपल्या पार्श्वभूमीचा वापर करून इतरांवर दबाव आणण्याऐवजी संयमाने वागण्याचा अप्रत्यक्ष संदेशही त्याने दिला.
सेहवागच्या या संतप्त प्रतिक्रियेनंतर मनीष कश्यपने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. “सर, मी आधीच सांगितले होते की मी कोणालाही शिवी देणार नाही; पण कोणाकडून शिवीगाळही सहन करणार नाही,” असे त्याने स्पष्ट केले. त्यावर सेहवागने त्याला प्रत्युत्तर देताना, “मग तुम्ही पुन्हा त्याच ठिकाणी जा. तुम्हाला ऐकायचे नसेल, तर ऐकू नका,” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली.यानंतर मनीषने गौतम गुलाटीसोबत झालेल्या वादाचे स्पष्टीकरण दिले. गौतमने पहिल्यांदा शिवी दिली, तेव्हा आपण त्याला तसे न करण्यास सांगितले होते. मात्र, दुसऱ्यांदा त्याने शिवी दिल्यानंतर आपण प्रतिक्रिया दिली, असे मनीषने सांगितले. सेहवागने समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही मनीष आणि गौतम यांच्यातील वाद थांबला नाही. दोघेही एकमेकांशी वाद घालत राहिल्याने सेहवागचा संताप आणखी वाढला आणि तो कार्यक्रमाचा मंच सोडून निघून गेला. काही वेळानंतर तो पुन्हा परतला आणि त्याने शोचे सूत्रसंचालन पूर्ण केले.दरम्यान, ‘राइज अँड फॉल २’मध्ये तहसीन पूनावाला यांची वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून झालेली एंट्रीही चर्चेचा विषय ठरली आहे. २८ ऑक्टोबरच्या भागात सेहवागने तहसीन यांची शोमध्ये ओळख करून दिली. विशेष म्हणजे, तहसीन यांचे बंधू आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारे शहजाद पूनावाला हेदेखील या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी आहेत. मात्र, भावाच्या प्रवेशामुळे शहजाद फारसे आनंदी नसल्याचे नव्या प्रोमोमधून दिसून आले आहे. त्यामुळे पूनावाला बंधूंमध्येही शोदरम्यान काय घडणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
तहसीन पूनावाला हे राजकीय घडामोडींवर स्पष्ट आणि बेधडक मते मांडण्यासाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी सलमान खानच्या ‘बिग बॉस १३’ या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. आता ‘राइज अँड फॉल २’मधील त्यांच्या प्रवेशामुळे शोमधील समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एकीकडे मनीष कश्यप आणि गौतम गुलाटी यांच्यातील संघर्ष, तर दुसरीकडे तहसीन पूनावाला यांच्या एंट्रीमुळे निर्माण झालेली चर्चा, यामुळे हा शो सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
