मराठी चित्रपटाची सात भाषांत जगभरात गर्जना
‘गोंधळ’चा ग्लोबल ट्रेलर प्रदर्शित; ऑस्कर प्रवेशिकेमुळे वाढली उत्सुकता

मराठी चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. भारताची ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झालेल्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचा ग्लोबल ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या या चित्रपटाची सध्या मनोरंजनविश्वात चर्चा रंगली असून, चित्रपटाच्या कथेविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, हा चित्रपट मराठीसह तब्बल सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याने महाराष्ट्रातील लोकपरंपरा आणि संस्कृती जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळणार आहे. येत्या १३ नोव्हेंबर २०२६ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
‘गोंधळ’ हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि इंग्रजी अशा सात भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतासोबतच अमेरिका, ब्रिटन, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई आणि आफ्रिकेतील प्रेक्षकांपर्यंतही हा चित्रपट पोहोचवण्याची निर्मात्यांची योजना आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण जीवन, सांस्कृतिक परंपरा आणि लोकविश्वास यांची पार्श्वभूमी असलेली कथा जागतिक स्तरावर मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शक संतोष डावखर यांनी केला आहे. ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याने या चित्रपटाकडे विशेष लक्ष लागले आहे.
काय आहे ‘गोंधळ’ची कथा?
‘गोंधळ’ हा मानसशास्त्रीय थरारपट असून, त्याची कथा सुमन नावाच्या तरुण विवाहित महिलेभोवती फिरते. वैवाहिक आयुष्यातील असमाधान, नात्यांमधील गुंतागुंत, मानवी इच्छा आणि विश्वासघात अशा भावनिक व मानसिक पैलूंचा वेध या चित्रपटात घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील गोंधळ विधीला कथेत महत्त्वाचे स्थान आहे. या पारंपरिक विधीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या गूढ घटनांमुळे कथेला वेगळे वळण मिळते.वैयक्तिक स्वार्थ, आसक्ती आणि गावातील सत्तासंघर्ष यांमुळे पात्रांच्या आयुष्यातील गुंतागुंत अधिकच वाढते. एका पवित्र विधीच्या वातावरणात उलगडणारी रहस्ये आणि कथानकातील अनपेक्षित वळणे हा चित्रपटाचा प्रमुख आकर्षणबिंदू ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि मानसशास्त्रीय रहस्य यांचा संगम असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दिग्गज कलाकार आणि संगीताची खास जोड
या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निशाद भोईर आणि अनुज प्रभू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती संतोष डावखर यांनी केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ज्येष्ठ संगीतकार इलैयाराजा यांनी सांभाळली आहे.सात भाषांमधील प्रदर्शन, महाराष्ट्राच्या परंपरेशी जोडलेले कथानक आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची तयारी यामुळे ‘गोंधळ’ हा मराठी चित्रपटासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आता १३ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
