‘कमळी’ मालिकेत भावनिक वळण!
अन्नपूर्णा आजींची हरवलेली नात अखेर भेटणार

काळाच्या ओघात काही नाती दुरावली, तरी त्यांच्यातील प्रेम आणि आपुलकी कायम राहते. अनेक वर्षांपासून हरवलेल्या आपल्या माणसाच्या भेटीची प्रतीक्षा करणाऱ्या कुटुंबासाठी तो क्षण आनंदासोबत भावनांचाही ठेवा घेऊन येतो. झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेतही असाच एक हळवा आणि महत्त्वाचा प्रसंग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कमळीच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल होण्याच्या दिशेने कथानक पुढे सरकणार असून, तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
अन्यायाचं प्रतीक असलेल्या कामिनीचा रावणाच्या रूपातील अंत झाल्यानंतर कमळी आणि राजन यांची भेट घडणार आहे. या भेटीनंतर कथानकात आणखी एक महत्त्वाचा खुलासा होईल. कमळीची अन्नपूर्णा आजींशी भेट होणार असून, या घटनेमुळे महाजन कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. अनेक दिवसांपासून ज्या नातीची वाट पाहिली जात होती, ती हरवलेली नात अखेर पुन्हा भेटल्याने अन्नपूर्णा आजींच्या आयुष्यात आनंदाचा क्षण येणार आहे.
कमळीची खरी ओळख काय, तिच्या आयुष्यात पुढे कोणते बदल घडणार आणि तिच्या भूतकाळातील रहस्यांचा उलगडा कधी होणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता अन्नपूर्णा आजी आणि कमळी यांच्या भेटीमुळे मालिकेच्या कथानकाला नवं वळण मिळणार आहे. ही भेट केवळ दोन व्यक्तींना एकत्र आणणारी नसून, दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जोडणारा आणि कुटुंबाला भावनिकदृष्ट्या एकत्र आणणारा क्षण ठरणार आहे. या निमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळण्यासोबतच नव्या नात्यांची वीणही घट्ट होणार आहे.
आतापर्यंत अनेक संकटांचा सामना करत स्वतःला सिद्ध करणारी कमळी आता आयुष्याच्या एका नव्या टप्प्यावर पोहोचणार आहे. अन्नपूर्णा आजींच्या भेटीतून तिला कुटुंबातील माया, प्रेम आणि आपलेपणाचा अनुभव घेता येणार आहे. मात्र, या पुनर्भेटीनंतर महाजन कुटुंबातील नात्यांमध्ये नेमके कोणते बदल घडतील, कमळीच्या आयुष्यातील इतर रहस्यांची उकल कशी होईल आणि तिचा पुढील प्रवास कोणत्या दिशेने जाईल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
