ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांच्या प्रकृतीबाबत करीनाचा खुलासा
स्मरणशक्तीवर झाला परिणाम

हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंब नेहमीच चर्चेत असते. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवली आहे. मात्र, सध्या ते त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची मुलगी आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान हिने अलीकडेच वडिलांच्या आरोग्याविषयी माहिती दिली. रणधीर कपूर यांच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला असून, त्यांना डिमेन्शियाचा त्रास असल्याचे करीनाने सांगितले.
करीना कपूर खान नुकतीच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात तिने कुटुंबातील काही आठवणी सांगताना वडिलांच्या प्रकृतीविषयीही भाष्य केले. रणधीर कपूर यांचे वय आता सुमारे ८० वर्षांच्या आसपास असून, वाढत्या वयामुळे त्यांच्या स्मरणशक्तीत काही प्रमाणात घट झाल्याचे तिने स्पष्ट केले. अलीकडेच तिचे आई-वडील तिच्या घरी आले होते. रणधीर कपूर अनेकदा जुने चित्रपट पाहण्यात वेळ घालवतात, असेही करीनाने सांगितले. वडिलांची स्मरणशक्ती पूर्वीच्या तुलनेत काहीशी कमी झाली असून, त्यांना डिमेन्शियाचा त्रास असल्याची माहिती तिने दिली.
दरम्यान, करीना कपूर एका लोकप्रिय दूरचित्रवाणी कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे समजल्यानंतर रणधीर कपूर यांना विशेष आनंद झाला होता. करीनाने या कार्यक्रमाविषयी त्यांना सांगितले असता, आपण तो नक्की पाहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. वडिलांची ही प्रतिक्रिया सांगताना करीना भावूक झाली. या प्रसंगातून वडील-मुलीमधील जिव्हाळ्याचे नातेही समोर आले.
काय आहे डिमेन्शिया?
डिमेन्शिया ही केवळ विसरभोळेपणाची समस्या नसून, मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करणारी स्थिती आहे. यामुळे व्यक्तीच्या स्मरणशक्तीसह विचार करण्याची क्षमता, संभाषणातील माहिती लक्षात ठेवणे आणि दैनंदिन कामे पार पाडणे यांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात.या स्थितीची लक्षणे आणि त्यांची तीव्रता प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असू शकते.
वाढत्या वयानुसार स्मरणशक्तीत काही बदल होणे शक्य असले, तरी वारंवार गोष्टी विसरणे, एकच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणे किंवा परिचित ठिकाणीही गोंधळून जाणे यांसारखी लक्षणे दिसल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते. रणधीर कपूर यांच्या प्रकृतीविषयी करीनाने केलेल्या या खुलाशामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये त्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
