31 ऑक्टो. 2026, 20:39

tarunbharat

सर्च
मनोरंजन

एकमेकांना समजवून घेण्यातच जगण्याचे सौंदर्य दडले आहे: श्रीपाद अपराजित

शरद व्याख्यानमाला पुष्प पहिले

एकमेकांना समजवून घेण्यातच जगण्याचे सौंदर्य दडले आहे: श्रीपाद अपराजित
तरुण भारत

आपण लोकांशी जसे वागतो तसे लोक आपल्याशी वागतात हा सामूहिक जगण्याचा परिपाठ आहे. दुसर्‍याच्या सुखात आपण आनंदाने सहभागी होतो तसे त्यांच्या दुःखात सुद्धा समरस होणे आपल्याला जमले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही, कारण आपल्या जगण्यातील जाणीवा प्रगल्भ झालेल्या नसतात त्यासाठी मनातील संवेदना व करुणेचा विस्तार व्हावा लागतो, तेव्हा माणूस म्हणून जगत असताना एकमेकांना समजून घेणे यातच जगण्याचं खरं सौंदर्य दडलेआहे, असे मौलिक विचार नागपूर येथील लेखक व संपादक श्रीपाद अपराजित यांनी व्यक्त केले.

ते कारंजा येथील कै. नानासाहेब दहीहांडेकर प्रांगणात सुरू असलेल्या शरद व्याख्यानमालेत २३ ऑटोंबर रोजी बोलत होते. जीवन सुंदर आहे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. प्रारंभी सुधीर आमले व डॉ.अनघा कांत यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. पद्माकर मिसाळ यांनी प्रास्ताविक केले तर प्रसन्न पळसकर यांनी त्यांचा परिचय करून दिला. यावेळी जीवनात सुंदरता निर्माण करणार्‍या मूल्याविषयी बोलताना अपराजित पुढे म्हणाले की, सुंदरतेसाठी माणसाची संकुचित वृत्ती बदलून ती व्यापक झाली पाहिजे. भेदभावाच्या ,जातीपातीच्या कुठल्या सीमा नसाव्यात ..हे सांगताना त्यांनी प्रसिद्ध कवी जावेद अख्तर यांच्या ओळी उदृत केल्या. पंछी नदियां पवन के झोके कोही इनको ना रोखे पक्षी नदी आणि हवा हे स्वैरपणे भ्रमण करताना भेदाभेदाचे कोणतेच बंधन पाळत नाही. समाजात आपले स्थान मोठे आहे मी इतरापेक्षा वेगळा आहे असा अहंकार जेव्हा माणसात निर्माण होतो, तेव्हा सौंदर्य विरोधी भावना निर्माण होत असते. असे अपराजित म्हणाले.

माणसाची कृती ही निरागस असावी.त्याला माणुसकी जपता आली पाहिजे. जगण्यावरची श्रद्धा अभंग राहिली पाहिजे. आपल्यामध्ये ज्या उणिवा आहेत त्यात सामर्थ्य निर्माण करता आले पाहिजे. दुःखाने विचलित न होता जगण्यातील आनंद शोधता आला पाहिजे. परिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या वर्तनातून केली पाहिजे. या सर्व बाबीतून आपल्याला जीवनात सौंदर्य निर्माण करता येईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार योगेश देशमुख यांनी केले तर शारदा स्तवन डॉ. सुशील देशपांडे यांनी म्हटले.या वर्षी पाऊस कमी झाल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय