31 ऑक्टो. 2026, 20:38

tarunbharat

सर्च
अर्थकारण

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदकांची कमाई

राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण व रौप्यपदकांची कमाई
तरुण भारत

जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशाचे शिखर गाठता येते, हे मालेगाव येथील विजय मानवतकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. पुणे येथे झालेल्या १८ व्या राज्यस्तरीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात सुवर्णपदक, तर १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे मालेगावसह वाशीम जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

१७ व १८ ऑटोबर रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे - बालेवाडी येथे ही स्पर्धा पार पडली. इंटरनॅशनल पॅराऑलिम्पिक कमिटी जर्मनी व पॅराऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडीयाशी संलग्न असलेल्या तसेच भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त पॅराऑलिम्पिक स्पोटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत विजय मानवतकर यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने पदकांवर नाव कोरले. मानवतकर यांच्या या यशाबद्दल वाशीम येथील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेते खेळाडू पुढील महिन्यात भोपाळ येथे होणार्‍या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे विजय मानवतकर यांच्यासमोर आता राष्ट्रीय स्तरावरही आपल्या कौशल्याची छाप उमटविण्याची संधी आहे. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धांसाठी भारताचे प्रतिनिधित्व करणार्‍या खेळाडूंच्या निवडीची प्रक्रियाही महत्त्वाची ठरते.

विजय मानवतकर यांचे हे यश केवळ पदकांपुरते मर्यादित नसून, ध्येयाप्रती समर्पण, कठोर परिश्रम आणि स्वतःवरील विश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या या यशामुळे दिव्यांग खेळाडूंनाही क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेण्याची प्रेरणा मिळत आहे. आता राष्ट्रीय स्पर्धेतही विजय मिळवून महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवावा, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.

गोपनीयता पर्याय