बेलतरोडीत १.५४ कोटींचे ड्रग्ज जप्त; पाच जणांना अटक!
क्राइम ब्रँच युनिट-५ची मोठी कारवाई; नागपुरातील सर्वात मोठी कारवाई

शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवसायाविरुद्ध गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत बेलतरोडीतील नरेंद्रनगर परिसरातील एका फ्लॅटमधून १ किलो ४०५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) जप्त केला. या पदार्थाची बाजारात किंमत १ कोटी ४० लाख ५० हजार रुपये असून रोख रक्कम, मोबाइल, कार आणि चार दुचाकींसह एकूण १ कोटी ५४ लाख ५० हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
क्राइम ब्रँचच्या युनिट क्रमांक ५ चे पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या पथकाने २४ ऑक्टोबरच्या रात्री गुप्त माहितीच्या आधारे रिंग रोडवरील भारत पेट्रोल पंपाजवळ असलेल्या विजया अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर छापा टाकला. या कारवाईत पाच जणांकडे एमडी प्रतिबंधित अमली पदार्थ आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अनिकेत ऊर्फ अन्नू संजय बिहारे (१९, भांडेवाडी), शुभम ऊर्फ डोरेमॉन दिलीप नरवरिया (३१, मानेवाडा), कृष्णा सुनील वर्मा (१९, गणेशपेठ), तूफानसिंह बालूसिंह सिसोदिया (३८, राजस्थान) आणि राहुल रामकुमार गोंड (३२, वाठोडा) यांचा समावेश आहे. अनिकेत बिहारे हा मकोका प्रकरणात फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी कारवाईत सहा अँड्रॉइड मोबाइल, एक हुंडई कार, चार दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, एक बॅग आणि ३ लाख ४४ हजार ७०० रुपये रोख जप्त केले.
आणखी तिघांना घेण्यात येणार ताब्यात
या प्रकरणात कुख्यात आरोपी विशाल ऊर्फ फल्ली पृथ्वीलाल गुप्ता, राजस्थानातील भूपेंद्रसिंग आणि भांडेवाडीतील सहेली पंधराम यांना मकोकामध्ये ताब्यात घेण्यात येणार आहे. विशाल फल्ली हा पोलिसांच्या अभिलेखावरील कुख्यात आरोपी असल्याचे सांगण्यात आले. जप्त केलेला अमली पदार्थ कुठून आणण्यात आला आणि या कथित ड्रग्ज नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.बेलतरोडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्याच्या गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्राइम ब्रँच युनिट-५चे पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्या नेतृत्वात पुढील तपास सुरू आहे.
१ किलो ४०५ ग्रॅम — एमडी
१.४० कोटी रुपये — पदार्थाची किंमत
१.५४ कोटी रुपये — एकूण जप्त मुद्देमाल
५ आरोपी अटकेत — त्यात मकोका प्रकरणातील फरार आरोपीचा समावेश
स्रोत: तरुण भारत — मूळ बातमी वाचा.
